Saturday 12 October 2013

माझ्या, शाळेतल्या १३ जूनच्या आठवणी ..



टीप : या कथेतील सर्व पात्र आणि घटना लेखकाच्या वैयक्तिक जीवनाशी निगडित असून, यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

प्रस्तावना-

काही दिवसांपूर्वीच 'पुलं'च्या निवडक पु.ल. या सदरातील कही लेख माझ्या वाचण्यात आणि ऐकण्यात आले.
पुलंनी त्यांच्या लेखातून जिवंत केलेल्या व्यक्तिरेखा ऐकत आणि वाचत असताना त्या स्वतः डोळ्यांसमोर उभ्या राहिल्याचा भास प्रत्येक वेळेस होत होता. त्यांचीच प्रेरणा घेऊन माझ्या देखील शाळेतील एका इयत्तेतील पहिल्या दिवसाच्या काही आठवणी मांडण्याचा मी एक प्रयत्न केला आहे.


🙏🏻🌹 "हा माझा पहिलाच प्रयत्न भगवंताच्या चरणी अर्पण.." 🌹🙏🏻


…. जूनचा महिना.... .... आठच दिवसांपूर्वी मान्सूनला सुरुवात झाली असल्यामुळे बाहेर पावसाच्या संततधारा चालूच होत्या.

रात्री १० ची वेळ असावी… जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे टी.व्ही. समोर बसून Cartoon Network वर Scooby Doo बघत होतो. तेव्हढ्यात बाबांचा प्रश्न कानावर पडला, "काय रे, तयारी झाली का?"

मला एकदम लक्षात आलं नाही, मी बाबांना पुन्हा उलट प्रश्न विचारला, "कसली तयारी बाबा?"

"अरे, कसली तयारी म्हणून काय विचारतोस? उद्यापासून शाळा नाही का चालू होत?" बाबा म्हणाले.

बाबांनी अचानक विचारलेल्या त्या प्रश्नामूळे टीव्हीतील तो Scooby Doo दप्तर घेउन स्वतः शाळेत जात असल्याचे मला दिसले.

"हो बाबा, झालीय तयारी.… पण बाबा मला नवीन Compass Box आणि पावसाळी Sandal हवेत." मी काहीशा दबक्या स्वरात बाबांकडे मागणी केली होती.

"गाढवा, मग आतापर्यंत काय झोपला होतास का? रविवारी घेउया". असे म्हणून बाबा निघून गेले.

बाबांनी उद्यापासून शाळा चालू होणार याची आठवण करून दिली आणि जणू माझा टीव्ही पाहण्याचा आनंदच हिरावून घेतला होता. तेंव्हा वाटले की, शाळा १३ जून ऐवजी १३ जुलैला का नाही चालू होत? ……. पण माझे ते तसे वाटने निरर्थक होते.

तोच विचार करीत टीव्हीकडे शून्य नजरेने पाहत होतो. शाळेला सुट्टी पडल्यापासून केलेली मज्या मस्ती, खेळलेले खेळ नकळत डोळ्यांसमोर उभे राहून चेहऱ्यावर एक स्मितहास्य उमटलं.

Scooby Doo संपून Richie Rich लागल्याचे मला भानही नव्हते. तेव्हढ्यात आमच्या मातोश्रींनी आवाज दिला, "उद्या शाळेत जायचं आहे माहिती आहे ना? ८ वाजेपर्यंत झोपायचं नाहीय, लवकर उठायला पाहिजे, झोप आता… …"

"हो माहिती आहे की, झोपतो हां.." …मी काहीशा चिडक्या स्वरात बोललो. थोड्या वेळाने टि व्ही बंद केला आणि दुसऱ्या दिवशीचा विचार करत अंथरुणात बराच वेळ पडून राहिलो. नंतर झोप कधी कागली कळलेच नाही…

१३ जून……. सकाळची साडेपाच-पावणेसहा ची वेळ असावी.…… रात्रीपासून संततधार पडणाऱ्या पावसाचा जोर काहीसा वाढला होता.

… … जवळपास दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मनात नसतानादेखील सकाळी लवकर उठावे लागले होते. रडत रडत का होईना पण सारे काही आवरुन बाबांनी आणलेला शाळेचा नवाकोरा गणवेश घालून तयार झालो होतो. दप्तर तर काय रात्री आईनेच भरून ठेवलेले होते. तो शाळेचा पहिलाच दिवस असल्यामुळे डब्याला मात्र सुट्टी होती.

शाळेची सर्व तयारी होताच गरम गरम दुध Complan घालून आईने  प्यायला दिले. धो-धो पाऊस पडत असल्यामुळे आईपुढे जरा अजूनच लहान बनून आईला थोडा मस्का लावण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता… "आई… आई ग…, पाऊस खुप पडतोय, मी नाही जात आज शाळेत…"

मग आईने पाण्याची बाटली दप्तरात ठेवत समजविले होते, "सतिश, अरे आज पहिलाच दिवस आहे ना शाळेचा, मग वर्ग भरला तर तुला कुणाच्यातरी शेजारी वर्षभर शेवटच्या बाकावर बसावं लागेल बघ."

आईचे ते म्हणने मला काहीसे पटले होते, म्हणून पहिला बेंच पकडण्यासाठी म्हणून का होईना पण त्या धो-धो पावसात सुद्धा मी शाळेत जायला निघालो. शाळेत जाताना माझ्यासारखीच पहिल्या दिवशी शाळेत जाण्याचा कंटाळा करणारी काही मुलं पाठीवर दप्तराचं ओझं घेऊन जड पावलांनी शाळेचा रस्ता सावकाश कपात पुढे जात होती. मी मात्र चालत जाताना धो-धो पडणाऱ्या पावसाचा आनंद लुटत रस्त्यावरून वाहणारे पाणी पायाने उडवीत चाललो होतो.

शाळा… … जवळ जवळ दोन महिन्यांनी शाळेत पाऊल टाकले होते. भल्या मोठ्या मैदानावर मुलं-मुली बेलची वाट बघत घोळक्याने उभी होती. कोणी रेनकोट घातला होता, तर कोणी काळ्या-रंगीबेरंगी छत्र्यांचा आधार घेऊन स्वतःला पावसात भिजण्यापासून वाचवीत होते. बरीच मुलं मात्र स्वतःपेक्षा पाठीवर असलेले दप्तर, त्यातील नवीन वह्या - पुस्तकं जस जमेल तस छत्रीच्या छायेत झाकत होती… का तर, ती भिजू नयेत म्हनुन…

मैदानावर जागोजागी पावसाचे निखळ पाणी साचलेले होते, कोणी त्याच पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून केसांवर कंगवा फिरवत होते, तर कोणी त्याच पाण्यात दगड मारून साचलेले पाणी इतरांच्या अंगावर उडविण्याचा खट्याळपणा करत होते.

शाळेच्या कंपाउंडच्या पलिकडे असलेले 'इस्माईल' कॉलेजचे जंगल पावसामूळे अगदी हिरवेगार झाले होते. … जणू वसंत ऋतूमद्धे सगळीकडे निशिगंध बहरल्यासारखे वाटत होते… वार्षीक परीक्षा संपताच 'झाडे लावा, झाडे जगवा' या मोहिमेअंतर्गत शाळेच्या मैदानाभोवती लावलेली झाडे सुद्धा दोन महिन्यात बरीच मोठी झाली होती.

पावसाळा सुरु होण्याआधी संपूर्ण इमारतीला रंगकाम करण्यात आले होते. पावसामुळे इमारतीच्या भिंती स्वच्छ धुवून निघाल्यामूळे शाळेची इमारत जणू नव्या नवरीप्रमाणे नटल्यासारखी दिसत होती.

सर, मॅडम आपापसात गप्पा मारत शाळेत प्रवेश करताना दिसत होते.

शाळेत पोहचताच इमारतीच्या मुख्य गेटवर गर्दी करून पहिल्या रांगेत जागा मिळविण्याची आमची ती घडपड सुरु होती.

… … आणि ७:१० होताच बेल वाजली, शिपाई काकांनी गेट उघडला, गेट उघडताच धावत धावत जाऊन मी वर्गात शिरलो, काही स्वतःला हुशार म्हणवणाऱ्या मुलांनी माझ्या आधीच येउन वर्गातील फळ्यासमोरच्या रांगेतील जागा धरल्या होत्या. मी वर्गात शिरताच माझी नजर सर्वप्रथम त्या भिंतिकडेच्या रांगेतील पहिल्या व दुसऱ्या बाकावर गेली, ते दोन्ही बेंच मोकळे असल्याचे दिसताच मला जरा हायसे वाटले. आणि त्या भिंतिकडेच्या रांगेतील पहिल्या बाकावर मी माझा शिक्का उमटवीला. इतर मुला - मुलींची वर्गात लगबग सुरु झाली होती. आवडती जागा पकडण्यासाठी कोणी बेंचवरून उड्या मारत जाऊ लागले तर कोणी वर्गात शिरताच जो मिळाला तोच बेंच आपला वर्षभराचा सोबती असे समजून धन्यता मानली.

माझ्या मागोमाग संकेत, शितल व जयश्री सुद्धा वर्गात आले. पाचवी पासून दहावी पर्यंत आम्ही आमचा चौघांचा तो ग्रुप तोडला नव्हता. त्या भिंतीकडेच्या पहिल्या रांगेतल्या पहिल्या बाकावर मी आणि संकेत आणि बरोबर मागच्या बाकावर शितल आणि जयश्री बसत होती.

पाऊस जास्त पडत असल्यामुळे बरीच मुलं मुली गैरहजर राहिलेली होती, मग आमचा नेहमीचा बेंच पकडण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागले नव्हते.

हळू हळू वर्ग भरू लागला. …… मागोमाग वर्गातील इतर मुलं मुली येऊ लागली. जयश्रीने वर्गात पाऊल टाकताच नेहमीप्रमाणे माझ्या डोक्यात टपली मारून, "सतिश तू पास झालायस?" असा बालिश प्रश्न विचारला. आणि तिघे मिळून खळाळून हसले.  :)

माझ्याकडे मात्र या प्रश्नाचे उत्तर कधीच नसायचे…. आणि त्या प्रश्नास उत्तर देण्याचा मी कधी प्रयत्नही केला नव्हता. त्यानंतर त्यांच्या हसण्यात मी सुद्धा सामील झालो.

दरवर्षीच्या प्रार्थना म्हणणाऱ्या मुलामुलींच्या यादीमद्धे शितलचे नाव न विसरता आमचे वर्गशिक्षक लिहीत असत.

शितलचे गाणे जितके चांगले होते तितकेच ती अभ्यासातही हुशार होति. अगदी पुस्तकी किडा म्हणता येणार नाही पण Average Student होती. माझ्या माहितीप्रमाणे दरवर्षी वार्षीक परीक्षेत ६५% च्या खाली तिचे मार्क्स कधी आले नव्हते. पण एकदा मात्र संखे सरांनी गणिताच्या पेपरमद्धे ५० पैकी फक्त १ मार्क दिल्याचे तिने मला सांगितले होते, तेंव्हा मात्र मी पोटभर हसलो होतो. शाळेतील जवळपास सर्वच शिक्षक शितलला अगदी चांगले ओळखत असल्यामुळे संखे सर सुद्धा त्याला अपवाद नव्हते.… गणिताचा पेपर हातात मिळताच शितलचा रडवेला झालेला चेहरा पाहताच सरांनी तिला चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या होत्या.… ते संभाषण जारी त्या दोघांमद्धेच झाले असले तरीही मी पहिल्याच बाकावर असल्यामुळे मला मात्र चांगले ऐकायला येत होते.…
"शितल, आज तुला हा एक मार्क मिळाला आहे तर त्यात काही कमीपणाचे नाहीय… हा जो काही मार्क आहे तो तुझा स्वकमाईचा हक्काचा आहे… मान्य आहे की इतरांसाठी हे थोडे हास्यास्पद असेल पण यातून तू उद्या चांगला धडा घेशील अशी मला आशा वाटते.… आजच्या या मार्कांना काही मोल नाहीय, शुन्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कितीतरी महान व्यक्ती आपल्याला ठाऊक आहेत ना.…" शितल शांतपणे सरांचे म्हणने ऐकून घेत होती.…
सरांचे ते शब्द ऐकताच शितलच्या चेहऱ्यावर जणू नवीन आत्मविश्वास प्रगट झाला होता… नंतर पेपर घेऊन जागेवर परतताना त्याच रडवेल्या चेहऱ्यावर नवीन उमेद झळकली होती. आशेच्या किरणांनी तिचा चेहरा लख्ख उजळून निघाला होता.…

Average Student आहे म्हणून काय झाले, गणितात फक्त १ मार्क मिळविन्याइतकी शितल 'ढ' सुद्धा नव्हती. बाकी आम्ही तिघे मात्र गणितातच काय तर सर्व विषयांत अव्वल होतो. काही शिक्षक आमचे पेपर तपासून झाले की, आम्हाला इतके मार्क्स (इतके जास्त मार्क्स) पडूच कसे शकतात असा विचार करून कुठे एखादा मार्क कमी होतोय का ते पाहण्यासाठी, तर काही शिक्षक बिचाऱ्यांना पास होण्यापुरते तरी मार्क्स मिळावेत म्हणून कुठे एखादा मार्क वाढतोय का ते पाहण्यासाठी पेपर पुन्हा तपासायचे… …

संकेतचे इंग्रजी मात्र उत्तम होते, पाचवीपासूनच इंग्रजी विषयाचे त्याला चांगले धडे मिळाले होते. चाचणी, सहामाही, वार्षीक कोणतीही परीक्षा असो इंग्रजी विषयासाठी मी संकेतवरच अवलंबून असायचो, प्रत्येक परीक्षेत इंग्रजी मद्धे पास होण्याइतकी मदत तो मला नेहमी करत होता. …पण इतिहासाचे आणि संकेतचे काय वैर होते माहीती नाही. इतिहासाचा तास चालू होण्याआधी संकेत त्या इतिहासाच्या पुस्तकातील प्रत्येक क्रांतिकारकाच्या नावाने खडे फोडत असे.

शितलला वाचनाचा सुद्धा एक मोठा छंद होता. लायब्ररी मधील एन्ट्री बुक मधील पाने शितलच्या नावाने भरलेली असायची. लायब्ररी मद्धे असे एकही पुस्तक नसावे की ज्या पुस्तकाला शितलचा हात लागलेला नसावा. मधल्या सुट्टीत डब्बा खाऊन झाला की शितलची पावले आपोआप लायब्ररी कडे वळायची.… मी मात्र माझा डब्बा कसा बसा कधी अर्धा तर कधी पूर्ण संपवून Computer Hall मद्धे पळायचो… Computer Hall मधल्या ताईला थोडा मस्का लावला की छान मधली सुट्टी संपेपर्यंत Computer वर गेम खेळायला मिळायचा…

लायब्ररी मद्धे जाण्याचा प्रसंग मात्र माझ्यावर क्वचितच यायचा. कधी लायब्ररी मद्धे जावे लागलेच तर मात्र कोणी आपल्याला बघत तर नाहीय ना, याची खात्री करून आत पाऊल टाकत असे. उगाच कोणीतरी पाहीले की, सतिश आज लायब्ररीत गेला आहे, आणि वर्गात त्याने ही बातमी पसरवली तर वर्गातील इतर दुबळ्या मनाच्या मुला-मुलींना चक्कर वगैरे यायची.
त्यातूनही धाडस करून कधी लायब्ररीत पाऊल टाकताच शितल माझे चांगलेच स्वागत करायची… "अरे, सतिश ही लायब्ररी आहे, Computer Hall नाही… …" मी मात्र तिच्या त्या बोलण्याकडे नेहमीच दुर्लक्ष करायचो…

इतर विषयात Average असून सुद्धा शितलचे मराठी उत्तम होते. एखाद्या विषयावर ती बोलायला लागताच कोणीतरी मराठी भाषेत विद्वान असलेली व्यक्तीच बोलत असल्यासारखे वाटायचे. शब्द मोजून मापून वापरणारी, सगळ्यांशी आदबीने बोलणारी, तिच्या बोलण्यात एक वेगळेपणा होता. जणू तिच्या जिभेवर सरस्वती देवीचे वास्तव्य असल्यासारखे वटायचे.

याच विषयाला साजेसा एक छानसा किस्सा आठवतोय, …. "आमच्या वर्गाला एक वर्षी स्वतःला ओव्हर स्मार्ट समजणारी मुलगी मॉनिटर म्हणून दुर्दैवाने लाभली होती. एकदा मधल्या सुट्टीत त्या मॉनिटरची आणि शितलची शाब्दिक चकमक झाली, नवीन नवीन असलेल्या इंग्रजी विषयाची क्रेझ प्रत्येक विद्यार्थ्यामद्धे होतीच. (मग त्याला ती मॉनीटर तरी अपवाद कशी ठरेल.) याच क्रेझ मद्धे येउन ती मॉनिटर काही इंग्रजी शब्दांचा वापर करून चढ्या आवाजात शितलशी भांडत होती. शितल मात्र शांतपणे नेहमीच्या स्वरात शुद्ध मराठी मद्धे तिच्याशी संवाद साधत होती. काही वेळाच्या त्या शाब्दिक चकमकी नंतर ती मॉनिटर एकदम हसायलाच लागली… कारण भांडताना सुद्धा एखाद्या व्यक्तीचा स्वर हा इतका नॉर्मल आणि भाषा निर्मळ कशी असू शकते याचे तिला कौतूक वाटले असावे…"

प्रार्थना, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा चालू झाली होती… संपूर्ण प्रर्थानेमधील मला फक्त सुरुवातीचे राष्ट्रगीत आणि त्यानंतरची प्रतिज्ञा इतकेच तोंड पाठ होते. नंतर मी मात्र मौन धारण केल्यासारखा तसाच उभा असयचो. तेंव्हा मात्र संपूर्ण प्रार्थना संपेपर्यंत मागच्या बाकावर एकटीच असलेल्या जयश्रीला काय व्हायचे कोणास ठाउक?… … "सतिश प्रार्थना म्हणायच्या असतात रे, गप्प का उभा आहेस? म्हण… म्हण… प्रार्थना म्हण…." असे दबक्या आवाजात म्हणून अखंड प्रार्थना होईपर्यंत मला सतवयचची. मी पहिल्याच बाकावर असल्यामुळे मला तिची ती बडबड ऐकून घ्यावीच लागायची. उलट फिरून तिला "गप्प बस…!" म्हणण्याचे धाडस मी कधी केले नाही.

दररोज त्याच त्याच प्रार्थना म्हणून आणि ऐकून मुलही प्रार्थना म्हणायला कंटाळा करायची. पण गुरुवारचा दिवस मात्र खास असायचा…… मला प्रार्थनेतील ते एक गीत खूप आवडायचे, हे शितलला जेंव्हा कळाले तेंव्हापासून फक्त माझ्यासाठी म्हणून दर गुरुवारी शितल ते गीत म्हणायची. (त्या गीताचे बोल मला अजूनही आठवतात… 'उधळीत शतकीरणा उजळीत जनहृदया…' ….)

प्रार्थना संपताच …… मुल्यशिक्षणाची दोन-चार मुल्य वहीत उतरवून घेतो न घेतोच तो पहिला मुल्यशिक्षणाचा तास सुद्धा संपून गेला होता. उत्सुकता होती ती म्हणजे दुसऱ्या तासाला कोण येणार याची? कारण नवीन वर्षातील बरीच रहस्से त्या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या तासाला उलघडणारी असायची. तोच… तो वर्गशिक्षकांचा तास……

"वर्गशिक्षक कोण? त्यांचा विषय कोणता? कुलकर्णी सर तर नसतील ना?" हे प्रश्न सकाळच्या पहिल्या प्रार्थनेपासून मनात घर करून राहायचे. (पुलंच्या बिगरी ते मॅट्रिक या कथेतील दामले मास्तरांसारखे शिक्षक न लाभावेत, तर आमचे सुद्धा मागच्या इयत्तांचे कष्ट लक्षात घेता या वर्षी तरी सोळणकर मास्तरांसारखे शिक्षक आपल्याला सुद्धा वर्गशीक्षक म्हणून लाभावेत अशीच इच्छा दरवर्षी असायची.) थोडे खडूस शिक्षक असलेच तर त्यांचे कायदे ही  निराळेच असायचे, वर्गात मुलं दंगा करतात म्हणून एका बाकावर एक मुलगा आणि एक मुलगी असे बसवायचे. (पण शिक्षकांना कुठे ठाऊक होतं कि आम्ही दंगा त्याचसाठी तर करायचो… :) :P) पण… ते आम्हाला मान्य असयचे हां… …

वर्गशिक्षक आता सगळ्यांच्या जागा बदलणार याची चाहूल लागताच आम्ही चौघेही सावध व्हायचो. शिक्षकांनी जागा बदलण्या आधीच आम्ही आमच्या जागा आपापसात बदलून घेत होतो. मागच्या बाकावरची शितल पुढच्या बाकावर येउन बसत होती, आणि माझ्या शेजारचा संकेत मागे जयश्री च्या शेजारी जाऊन बसत होता. "आता झाले शिक्षकांच्या मनासारखे…!" मी मनातच म्हनायचो… आणि खरं सांगायचे तर ही कल्पना माझ्याच सुपीक डोक्यातून निघालेली असायची बरं का...

इतर मुलामुलींमद्धे, आपल्याला यावर्षी वर्गशिक्षक कोण येणार? याच बरोबर जागा बदलली तर शेजारी कोण बसणार याची उत्सुकता सुद्धा लागलेली असायची.

… … आणि आता तो सस्पेन्स संपला होतो, आम्हाला वाडेकर मॅडम वर्गशिक्षक म्हणून इंग्रजी विषयासाठी लाभल्या होत्या.…

काही वर्षांपूर्वी माझ्या भावाला सुद्धा वाडेकर मॅडमच वर्गशिक्षक म्हणून शिकवत होत्या. इंग्रजी हा त्यांचा मुख्य विषय. मुळातच दादा स्वतः हुशार असल्यामुळे शाळेतील जवळपास प्रत्येक शिक्षकांपुढे त्याची एक चांगली प्रतिमा बनली होती. त्यामुळे जेंव्हा संधी मिळेल तेंव्हा वाडेकर मॅडम मला दादाचे उदाहरण देऊन वर्गात सगळ्यांसमोर नेहमी माझा उद्धार करायच्या.

उद्धाराचे भरतवाक्य ठरलेलं असायचं, …. "अरे…, तुझा भाऊ बघ, आता इंजिनियरींगला शिकतोय आणि आपण… आपण कुठे आहात…??" हे मॅडमचे पेटंट वाक्य ठरलेलं असायचं. आमच्या सुदैवाने 'दामले' मास्तरांप्रमाणे वाडेकर मॅडम नव्हत्या पण त्यांनी 'सोळणकर' मास्तरांप्रमाणे वर्गात कधी गाणी म्हणून दाखवीली नाहीत तर कधी गोष्ठी सुद्धा सांगितल्या नव्हत्या.… पण वर्गात त्यांची शिकविण्याची पद्धत मात्र निराळी होती. त्या इंग्रजीचे व्याकरण गाण्याच्या चालीवर शिकवीत होत्या. म्हणजे, "I play Cricket, You play cricket, He plays cricket रेSSSSS…. We play cricket, They play cricket, It plays cricket रेSSSSS…. म्हणा…." मग त्यांच्या मागोमाग त्याच गाण्याच्या चालीवर ती वाक्ये आम्ही म्हणत होतो …
ती शिकवणी कितीही निराळी असली तरीही मजेदार असायची… त्या गाण्याच्या चालीवर पाठ झालेले व्याकरण आज सुद्धा उपयोगी ठरतेय…

मॅडमचे वर्गात लक्ष सुद्धा बारीक असायचे…. अखंड वर्ग जरी मॅडमच्या मागोमाग व्याकरणाची उजळणी करीत असला आणि एखादा विद्दार्थी नुसतेच ओठ हलवून टाईमपास करीत असल्याचे मॅडमच्या चटकन ध्यानात यायचे. … तेंव्हा मात्र आमच्यासारखेच लहान होऊन आम्हाला गाण्यातून शिकविणाऱ्या वाडेकर मॅडम मधील खरा-खुरा शिक्षक जागा व्हायचा… आणि टेबलवरच्या लाकडी पट्टीने चांगले फोडून काडायच्या … "अरे… तुमच्यासाठीच ही सर्व गाण्यांची उठाठेव चालू आहे ना… … एकवेळ कळले नसेल तर सांगा… पुन्हा म्हणू …. पण … … येत नाही म्हणून उगाच तोंडाची हवा  घालवीत बसणार का … …?"

वर्गशिक्षक वर्गात आल्या, पहिल्या दिवसाची पहिली हजेरी सुद्धा लागली, वर्गशिक्षकांचा तास या नात्याने त्या तासाचे थोडे सोपस्कार पार पाडताच दुसऱ्या तासाची बेल वाजताच तो दुसरा तास संपून गेला होता.

पहील्याच तासाला नवीन वर्षाचे वेळापत्रक दिलेले होते त्यामुळे तिसरा तास मराठीचा होता याची कल्पना आली होती.  आपल्याला मराठीसाठी महाडीक मॅडमच मिळाव्यात ही इच्छा दर वर्षी जणू प्रत्येक मुलाची असायची.  आणि त्या वर्षी माझी ही इच्छा पूर्ण झाली होती. आम्हाला महाडीक मॅडम मराठी विषयासाठी लाभल्या होत्या. महाडीक मॅडम मराठी विषय शिकउ लागताच आपला जन्म या महाराष्ट्रात मराठी म्हणून झाल्याचे सार्थकी लागल्यासारखे वाटायचे…

अपेक्षे प्रमाणे मॅडम वर्गात आल्या.… पहिलाच दिवस असल्यामुळे त्या दिवशी शिकवणी झालीच नव्हती. पण अर्धा तास घालवायचा कसा? म्हणून मॅडमनी सर्व मुलांना एक एक करून आपली ओळख द्यायला सांगितली.

वर्गातील प्रत्येक विध्यार्थी आपली ओळख सांगू लागला होता… मी मात्र तिसऱ्या तासाच्या बेलची वाट पाहत बाहेर पडणारा पाऊस पाहण्यात दंग होतो.  नाव सांगण्यासाठी माझा नंबर आल्याचे मला भानच नवते…. "जयश्री गिरफ", "शितल डिचवलकर", "संकेत साळसिंगीकर"…. … तेव्हढ्यात मागून माझ्या पाठीवर थाप पडली, मी एकदम भानावर आलो. …. "अं …… …… सतिश, सतिश रावण"…

मला वाटलं आता पहिल्याच दिवशी मॅडमचा ओरडा खावा लागणार की काय? पण तसे काही घडले नव्हते… पण माझ्या त्या चुकीची शिक्षा तर होणारच होती. … मॅडमनी एखादी कविता म्हणण्याची किंवा गोष्ट सांगण्याची शिक्षा मला दिली होती. मराठी व्याकरणातील वृत्ते मला चांगली तोंडपाठ होती. त्यातलीच "मेघांनी हे गगन भरता गाढ आषाढमासी, होई पर्युत्सुक विकल तो कांत एकांतवासी, तन्निःश्वास श्रवुनि रिझवी कोण त्याच्या जिवासी? मंदाक्रांता सरस कविता कालिदासी विलासी" ही कविता मी म्हणून दाखवली. … स्वतः महाडीक मॅडमनी माझ्यासाठी टाळ्या वाजविल्या होत्या… त्या नंतर वर्गातल्या प्रत्येक मुला-मुलीने माझ्यावर टाळ्यांचा वर्षाव केला होता. कोणीतरी माझ्यासाठी केलेला टाळ्यांचा वर्षाव बघून मी पुरता भारावून गेलो होतो. …

"खाली बस…" मॅडमनी आदराने मला सांगितले होते. मी बाकावर बसताच, माझ्या पाठीवर पुन्हा एक थाप पडली, पण या वेळेस ती शाब्बासकीची थाप होती… आणखीन कोण? शितलच ती…

सगळ्यांची ओळख घेउन झाली… तास संपण्याची बेल व्हायला काही अवकाश होता. त्या दिवशी विषयाची शिकवणी झाली नव्हती पण पहिला दिवस सार्थकी लागावा म्हणून मॅडमनी निबंधाचा विषय दिला होता, विषय सुद्धा पहिल्या दिवसाला साजेसाच होत.…  'धो-धो पावसातला शाळेचा माझा पहीला दिवस…' आणि तेव्हढ्यात बेल वाजली …

पहिल्याच दिवशी ज्या कारणामुळे मला मॅडमचा ओरडा खावा लागणार होता तो तो पुढचा क्षण होता…

येSSSSस… … तो P.T. चा तास चालू झाला होता.… शाळेतल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय… P.T. (वरील वाक्य 'पुस्तकी किडे' असलेल्या मुलांना साजेलच असे नाही.)

… … आणि तिसऱ्या तासाची बेल होताच वर्गात जणू माझ्यावर आक्रमण झाले होते… पहिल्याच दिवशी हजेरी घेताना रोल नंबर नसल्यामुळे प्रत्येकाचे आडनाव घेऊन हजेरी विचारली होती. त्यातच भर पडली ती म्हणजे तिसऱ्या तासाच्या 'आपली ओळख द्या' या कर्यक्रमामुळे.… माझ्या वर्गात नवीन आलेल्या मुलांसाठी 'रावण' हे आडनाव नवीन आणि काहीसे हास्यास्पद होते.

वर्गातील काही टार्गट मुलं मला आडनावावरून चिडउ लागली होती. तेव्हढ्यात सागवेकर सरांनी वर्गात पाउल टाकले होते.

जवळपास सहा फुटांची पहाडी उंची, थोडासा सावळा रंग, अंगात सहसा मोकळा सोडलेला शर्ट, कमरेवर Pant, डोळ्यांवर एखाद्या चित्रपटाच्या नायकाला शोभावा असा बारीक काड्यांचा चश्मा, जणू छत्रपती शिवरायांच्या एखाद्या सरदाराला शोभावा असा बाणेदार आणि सानुनासीक सुस्पष्ट आवाज, पायात काळे चामड्याचे बूट, एका हातात एक लाकडी पट्टी आणि खडू, … …

सरांनी वर्गात पाऊल टाकताच वर्गात चालू असलेला आरडाओरडा गोंगाट अचानक शांत झाला. आणि माझ्यासह प्रत्येक विधार्थ्याचा आनंद हा वर्णन न करण्यासारखा दुपटीने वाढला होता. करण मराठी विषया सारखीच P.T. साठी सागवेकर सरच यावेत अशी इच्छा सुद्धा जणू प्रत्येकाची असायची.

पण तो आनंद त्या दिवशी सार्थकी लागणार नव्हता… पावसाच्या संततधारा चालूच असल्यामुळे सर आम्हाला बाहेर मैदानावर घेऊन जाणार नव्हते….

"मग अर्धा तास वेळ घालवायचा कसा?" असा प्रश्न सागवेकर सरांना देखील पडला.… त्यांनी सुद्धा नेहमीचीच शक्कल आजमावली, वर्गात आलेल्या नव्या मुला मुलींची ओळख करून देण्यास सांगीतले…

पहिल्या रांगेत पहिल्या बाकावर मी असल्यामुळे सुरुवात आमच्यापासूनच झाली… "मी, संकेत साळसिंगीकर" संकेतने नाव सांगितले आणि मी देखील माझे नाव सांगण्यासाठी उभा राहिलो, "मी, सतिश रावण"… आणि पुन्हा एकदा तोच हास्यकल्लोळ वर्गात सुरु झाला … सरांना काहीच कळेनासे झाले… कि वर्गातील मुलं अचानक का हसायला लागलीत?…

मागच्या इयत्तेत सागवेकर सर आम्हाला Secondary Class Teacher म्हणून होते आणि सामान्य विज्ञानासारखा महत्वाचा विषय त्यांनी शिकवीला  होता, त्यामुळे माझे नाव त्यांच्यासाठी नवे नव्हते. ते मला हुशार विधार्थ्यांसारखे नाही पण वर्गशिक्षक असल्यामुळे नावाने तरी चांगलेच ओळखत होते…

माझ्यावर झालेला शाब्दिक हल्ला पाहून सनांनी रिंगणात उडी घेतली होती, "अरे, मित्रांनो झालं काय? सगळे का हसतायं?" सरांनी स्वतःच्या स्टाइल मद्धे विचारले होते.  मात्र कोणीच उत्तर देईना…

तेव्हढ्यात शितलने स्वतः माझी बाजू सरांसमोर मांडली होती, "सर, याचे आडनाव 'रावण' आहे ना, म्हणून सर्व हसतयेत."
सरांना त्या बाबतचे गांभीर्य चटकन ध्यानात आले होते. आता सरांनी माझा पक्ष स्वीकारला होता… "सतिश, बाळ उभा राहा जरा." असे सांगून स्वतः सुद्धा खुर्चीवरून उठून उभे राहिले होते. पुढे काय होणार याची कल्पना कुणालाच नव्हती. मी मात्र सरांची आज्ञा पाळून खाली मान घालून माझ्या जागेवर शांतपणे उभा राहिलो होतो….

"रावण हा सर्वगुण संपन्न ब्राह्मण होता…" माझी बाजू घेऊन सरांनी माझ्या नावाला हसणाऱ्या प्रत्येक मुलासह अखंड वर्गाला धारेवर धरायला सुरुवात केली होती…

"रावण स्वतः महान शिवभक्त होता…, कुबेरासारखा धनवान राजा रावणाच भाऊ होता… रावणाकडे स्वतःचे पुष्पक विमान होते…"

माझी बाजू घेऊन सर संपूर्ण वर्गाला फैलावर घेत असल्याचे पाहून मला थोडा धीर वटला होता आणि माझी खाली असलेली मन नकळत उंचावली होती.

पहिलाच दिवस असल्यामुळे सकाळचे अधिवेशन संपताच काही वेळाने दुपारचे अधिवेशन भरणार होते, त्यामुळे आमचा चौथा तास संपण्या आधीच दुपारच्या अधिवेशनातील मुला मुलींची गर्दी मैदानावर जमा व्हायला लागली होती.

सरांना अजून बरच काही सांगायचे होते… पण, तेव्हढ्यात सरांनी घेतलेली माझी बाजू पाहता, आम्ही ज्या बेलची आतुरतेने म्हणतात कि काय तशी वाट पाहत असायचो ती बेल आज होऊच नव्हे असे वाटत होते. पण ते माझे वाटणे सुद्धा निरर्थकच होते…

चौथ्या तासाची ती बेल सुद्धा वाजली होती, सरांनी ते आपले शेवटचे वाक्य पूर्ण केले नव्हते… "रावण... ..." त्या शेवटच्या वाक्याची उकल मला आजतागायत झालेली नाहीय. …

तो चौथा तास संपला होता, आणि  त्या तासानंतर सागवेकर सरांनी मात्र मला 'सतिश' नावाशिवाय कधीच हाक मारलेली नहिय.…

पहिल्या दिवसाचा चौथा आणि शेवटचा तास सुद्धा संपून गेला होता… Announcement ऐकू आली…  "राष्ट्रगीत म्हणणाऱ्या मुलींनी ऑफीस मद्धे यावे…" पुन्हा एकदा वर्गात सगळ्यांची लगबग सुरु झाली, सर्व मुलं मुली स्वतःचे दप्तर आवरू लागली होती…

राष्ट्रगीताताठी शितल उठून जात असताना मला तिला Thanks म्हणायचे होते. पण माझ्या नकळतच ती दप्तर घेऊन निघून गेली होती…

राष्ट्रगीत सुरु झले…

… … भारत भाग्य विधाता
जय हे जय हे जय हे
जय जय जय जय हे॥

… … राष्ट्रगीत संपताच… शाळा सुटली. पावसाचा जोर मंदावलेला असला तरीसुद्धा रिपरिप पाऊस चालूच होता. सर्व मुलं मुली हळूहळू वर्गाबाहेर जात होती. त्या दिवशी संकेत एकटाच निघून गेला होता… मी आणि जयश्री मात्र हळूहळू शाळेच्या व्हऱ्हांड्यातून चालत जात होतो…

राष्ट्रगीत संपताच ऑफीसमधून लगेच बाहेर येउन शाळेच्या इमारतीच्या गेटजवळ असलेल्या सरस्वती देवीच्या मूर्तीसमोर शितल आमची वाट पाहत उभी होती. "संकेत कुठे आहे?" आम्ही पोहचताच  शितलने विचारले….

"तो गेला एकटाच…" जयश्री म्हणाली.

आणि आमही तिघेही इमारतीच्या गेटबाहेर पडलो… इमारतीच्या गेटसमोर दुपारच्या अधिवेशनातील मुला मुलींची गर्दी असल्यामुळे मी मात्र छत्री न उघडताच गर्दीतून वाट काढत पुढे जात होतो… गेटच्या बाहेर पडताच शितल आणि जयश्रीने मात्र छत्री उघडली होती… त्या दिवशी पावसाच्या थेंबांप्रमाणेच मला झालेला आनंद माझ्या चेहऱ्यावरून वाहत होता. कारण सागवेकर सनांनी स्वतः माझी बाजू घेतली होती ना… :)

त्याच आनंदात मैदानावरच्या गर्दीतून आम्ही तिघेही वाट काढत जात असतानाच शितलने एका मुलीकडे बोट दाखवीले, आणि म्हणाली "सतिश… ती बघ,… सविता …"
(वरील वाक्यातील 'सविता' हे तिचे बदललेले नाव आहे हे सुज्ञास सांगणे न लगे.)

कंपाउंडच्या भिंतीकडेला ती एकटीच उभी होती. कदाचीत तिच्या मैत्रीणींची वाट बघत असावी. छोटेसे पण मुलायान केस, त्यावर तो लाल रंगाचा Hair Band, नाजूक बांधा, पायात नवीन घेतलेले पावसाळी Sandals, नवाकोरा युनिफॉर्म, एका हातात छत्री आणि शाळेचा पहिलाच दिवस असून देखील पाठीवर भलं मोठं दप्तर… दिसायला अगदी जवळपास Cartoon Network वर लागणाऱ्या Snow White मधील राजकन्येसारखी… तसेच निरागस काळेभोर डोळे …

सविता, सातवी इयत्त्येत असताना आमच्या वर्गात तिचे नवीन Admission झाले होते. आमचा वर्ग म्हणजे "फ" (F) …. (पाचवी पासून दहावी पर्यंत आम्ही हा मान हाताचा जाऊ दिला नव्हता.) ती दिसायला जितकी सुंदर होती तितकीच अभ्यासातही हुशार… शाळेतल्या परीक्षांमद्धे जवळ जवळ सर्वच विषयांत पैकीच्या पैकी मार्क मिळविणे तिने कधी सोडले नव्हते.

दरवर्षी आमच्या इयत्तेमद्धे असलेल्या 'अ' (A) वर्गातील पहिल्या येणाऱ्या मयुरी पुराणीकला सविताने गेले दोन वर्षांपासून मागे टाकले होते.

'फ' वर्गात इतक्या हुशार मुलीचे Admission चुकून झाले कि काय? असा प्रश्न कोणालाही पडला असता तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नव्हते. सविताच्या हुशारीचे कौतुक शाळेतील सर्व शिक्षकांकडून तर होत होतेच, पण शाळेच्या मॅनेजमेंट कमिटीकडून सुद्धा सविताचा सातवीच्या वार्षिक परीक्षेच्या निकालानंतर गौरव करण्यात आला होता… आणि माझी तर काय विकेटच पडली होती…

सातवी इयत्त्ये नंतर तिची गुणवत्ता लक्षात घेता आमच्या वर्ग शिक्षकांनी तिची Transfer 'अ' (A) वर्गात केली होती.…  आमच्या वर्गातून 'अ' वर्गात ती गेल्यापासून हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्यावेलाच ती मला शाळेत दिसली होती.…सविता  एक वर्ष आमच्या वर्गात असून सुद्धा तिची, संकेत सोबत आणि माझ्यासोबत जास्त ओळख नव्हती, ओळख म्हणायला इतकीच की कोणीतरी 'सतिश आणि संकेत' नावाची मुल आपल्या वर्गात आहे म्हणायला हरकत नव्हती. पण शितलला मात्र ती चांगली ओळखत होती, एक 'उत्तम गायिका' म्हनुन… आणि जयश्री तर काय तिच्या खट्याळ पणामुळे संपूर्ण वर्गात World Famous होती.

शितलने तिच्याकडे बोट दाखवताच आमची नजरानजर झाली होती, अगदी क्षणभरासाठीच… तेच ते निरागस डोळे, न बोलताही सर्व काही सांगून जाणारे …

मैदानातून जात असताना शितल आणि सविताची नजरानजर होताच त्या दोघींच्याही चेहऱ्यावर एक स्मितहास्य उमटल्याचं माझ्या नजरेतून सुटलं नव्हतं…

आम्ही पुढे निघून गेलो… आता माझ्या आनंदात आणखीन एका गोष्टीने भर टाकली होती…

शितल आणि जयश्री सोबत पहिल्या दिवसाच्या आठवणी मनात साठवत…… छत्री नउघडताच भिजतच रस्त्यावरून वाहणारे पावसाचे पाणी पुन्हा एकदा पायाने उडवीत घरी जायला निघालो होतो…

गरम गरम जेवन जेवत पहिल्या दिवसाच्या गमतीजमती आईला सांगायच्या म्हणून शाळेपासून घरापर्यंतचा तो लांबसडक रस्ता कधी संपून गेला ते कळलेच नाही.…


त्या दिवसाला आज बराच काळ लोटलाय, जवळपास १० वर्षांचा… या दहा वर्षात खूप काही बदललंय…

शाळेच्या इमारतीची उंची आज एका माजल्याने वाढलीय, वर्गांचे दरवाजे बदलले, खिडक्यांच्या काचा बदलल्या, वर्गातील बेंच बदलले, लाईट-पंखे बदलले, आमच्या वेळी काळ्या रंगाचे तडे गेलेले भिंतीवरचे फळे आता हिरवे काचेचे झालेत, कंपाउंडच्या भिंतीची दुरुस्ती होऊन त्याची सुद्धा उंची वाढवलीय. मैदानाभोवतालची झाडे आता बरीच मोठी झाली आहेत, लायब्ररी बदलली, कॅन्टीन सुद्धा टेबल खुर्चांनी अगदी सुसज्ज झालय, संगणक कक्ष अत्याधुनिक झालाय,…

मधल्या सुट्टीत गेटवरच्या शिपाई काकांना थोडासा मस्का लाऊन बाहेर जाऊन चॉकलेट आणण्याची मजा आता नाही राहिली…… गेटवरचे शिपाई सुद्धा आता कॉर्पोरेट झालेत… अवेळी कोणी शाळेच्या गेटच्या बाहेर जाताना आढळले तर त्याची सूचना थेट उपमुख्याध्यापकांच्या केबीन मद्धे जाते….

शाळेत नवीन नवीन ब्रांच सुद्धा सुरु झाल्यायेत म्हणे, शाळेच्या मध्यावर असलेले लहान मैदान सुशोभित झाले आहे… शिक्षक बदलले, कर्मचारी बदललेत, काही शिक्षक रिटायर होऊन गेले, तर काहींची नवीन भारती झाली आहे. काही गोष्टींचा उल्लेख न करता आमची पूर्वीची शाळा आज कुठेतरी हरवल्यासारखी वटतेय…

वर्गातील मित्र दुरावले… मैत्रिणी दुरावल्या… जुने - जाणते शिक्षक, शिपाई काका कुठे गेले कोण चौकशी करतंय… दहावीच्या त्या भयाण वर्षानंतर जणू प्रत्येकाच्या आयुष्यात नव्या वाटा निर्माण झाल्या होत्या. प्रत्येकजण स्वतःला आवडलेल्या वाटेवरून चालायला लागला होता.… प्रत्येकाचे मार्ग निराळे… वाटा निराळ्या…

… कोणी Graduation साठी Admission घेतले होते, कोणी Engineering साठी.… तर कोणी आणखीन कशासाठी…. काही दिवसांपूर्वी कोणाच्यातरी बोलण्यातून ऐकायला मिळाले होते की, "सविता Civil Engineer झालीय, आणि शितल मुंबईतल्या साठे महाविद्यालयात Professor आहे."

सविता चे Engineer झाल्याचे ऐकायला मिळणे स्वाभाविकच होते, … पण … शितलने मात्र शून्यातून विश्व निर्माण करून संखे सरांचे शब्द सार्थकी लावले होते. गणितात कधीकाळी फक्त १ मार्क मिळविणारी शितल आज Commerce Division च्या Senior Students ना Management Commerce सारखा विषय शिकउ लागली होती.

आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला देवाने मर्यादितच बालपण का दिले, याचा ते संपल्यानंतर फक्त विचार करण्यावाचून पर्याय उरत नाही. आजच्या या कॉर्पोरेट जगात प्रत्येकाच्या मनात एकदा न एकदा तरी असा विचार येउन गेला असेल की, "पुन्हा एकदा आपल्याला बालपण जगण्याची संधी मिळाली तर… …" कारण आज सुद्धा दुपारच्या वेळेस शाळेच्या गेटसमोरून जाताना शाळेच्या मैदानावर नजर जाताच मैदानावर खेळत असलेल्या मुलांकडे पाहून त्या चार-पाच सेकंदामद्धे आमचं सारं शालेय जीवन अगदी जसं च्या तसं डोळ्यांसमोर उभे राहिल्यावाचून राहत नाही…

"आमचे बालपण बहारून टाकण्यासाठी देवाने ज्या काही मौल्यवान देणग्या न मागता दिल्या होत्या, त्या न सांगता हिरावून नेल्या…"


...अपूर्ण
#SrSatish🎭

satish.satrav@gmail.com / satishravan@hotmail.com / sr.satish@outlook.com

 

अभिप्राय लिहा